सामान्यरूप
खालील वाक्ये वाचा.
मी शाळा जातो.
मी शाळेत जातो.
ही दोन वाक्ये तुम्ही वाचलीत. यांपैकी पहिले वाक्य चुकीचे आहे आणि
दुसरे वाक्य बरोबर आहे. या दोन्ही
वाक्यांमध्ये काय फरक आहे? पहिल्या वाक्यात ‘शाळा’ हा शब्द आहे. दुसऱ्या वाक्यात
‘शाळा’ या शब्दाला
‘-त’ हा प्रत्यय लागला आहे.
खालील वाक्ये वाचा.
(१) राम मित्राशी बोलतो.
(२) रेश्मा पालीला घाबरते.
(३) कल्पना दुकानात जाते.
या वाक्यांमध्ये,
नाम + प्रत्यय
मित्र + -शी
पाल + -ला
दुकान + -त
मित्र, पाल, दुकान या नामांना अनुक्रमे
-शी, -ला, -त हे प्रत्यय
जोडलेले आहेत. प्रत्यय लागण्यापूर्वी या
शब्दांमध्ये काही बदल झाले आहेत. उदा., मित्र
~ मित्रा-, पाल~पाली-,
दुकान~दुकाना-. शब्दाला प्रत्यय
लागण्यापूवीर् होणार्या या बदलाला शब्दाचे सामान्यरूप म्हणतात.
शब्दाच्या मूळ रूपाला सरळरूप म्हणतात.
उदा., ‘दुकान’ हे सरळरूप आणि दुकाना-
हे सामान्यरूप.
नामांना किंवा सवर्नामांना लागणारे प्रत्यय अनेक प्रकारचे
असतात. -ला,-त,-ने,-शी,-चा,-ची,-चे इत्यादी.
लक्षात ठेवा : काही वेळा
शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या रूपात बदल झालेला दिसत नाही.
उदा., खिडकी, खोली यासारखी ईकारान्त
स्त्रीलिंगी नामे.
शब्दाचे सामान्यरूप न करता काही वाक्ये तयार करा. ती मोठ्याने वाचा. नंतर सामान्यरूपासह ती पुन्हा तयार
करा. ती लिहिताना एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, की सामान्यरूपातला शब्द आणि त्याचे प्रत्यय जोडूनच लिहायचे
असतात. उदा., रवी ने पाल ला मारले.
X
रवीने पालीला मारले.ü
घोडा, माळ, पाल, घर, दुकान ही सामान्यनामे आहेत; पण अंजली, सुजाता, राजीव ही विशेषनामे
आहेत.
विशेषनामांना प्रत्यय लावताना त्यांचे सामान्यरूप होत
नाही. उदा.,
अंजलीला, सुजाताला, राजीवला.
----------------------------------------------------------
पुल्लिंगी नामाची सामान्यरूपे-
1) अ – कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप आ-कारान्त
होते.
* बैल- बैलाला
डोंगर – डोंगरात
2) आ- कारान्त व ए- कारान्त पुल्लिंगी नामाचे
सामान्यरूप या-कारान्त होते.
* मळा- मळ्यात
वाडा – वाड्यात फडके- फडक्यांना
3 ) ई- कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप या-कारान्त
होते
*शेतकरी- शेतकऱ्याला कोळी- कोळ्याला
4) संस्कृत मधून आलेल्या ई-कारान्त व ऊ- कारान्त
शब्दाचे सामान्यरूप दीर्घांन्त तसेच लिहावे
* कवी- कवीला साधू- साधूचे
5)ऊ-कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप वा-कारान्त
होते.
* भाऊ- भावाने लाडू- लाडवाचा
6) ओ-कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप ओ-कारान्तच राहते.
*किलो- किलोस.
------------------------------------------------------------
स्त्रीलिंगी नामाची सामान्यरूपे-
1) अ-कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एकवचनात ए-कारान्त
व अनेकवचनात आ-कारान्त होते.
* वाट- वाटेत- वाटात लाट- लाटेचा- लाटांचा
2) काही स्त्रीलिंगी अ-कारान्त शब्दाचे सामान्यरूप
ई-कारान्त होते.
*गाय- गाईला भिंत- भिंतीला
3)आ-कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप ए-कारान्त
होते.
*दिशा- दिशेला हवा- हवेत
4) ई- कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप
एकवचनात ई- कारान्त आणि अनेकवचनात या- कारान्त होते.
* पेटी-पेटीत-पेट्यात नदी- नदीने- नद्यांनी
5) ऊ- कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप
अनेकवचनात वा-कारान्त होते.
* सासू- सासूला- सासवांना.
6) ओ-कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप ओ-कारान्तच
राहते.
*बायको- बायकोचा
------------------------------------------------------------
नपुसकलिंगी नामांची सामान्यरूपे-
1) अ- कारान्त नपुसकलिंगी नामाचे सामान्यरूप आ-कारान्त
होते.
*झाड- झाडाचे दार- दाराचे
2)ई- कारान्त नपुसकलिंगी नामाचे सामान्यरूप या-कारान्त
होते.
*लोणी- लोण्याचा
3)ए- कारान्त नपुसकलिंगी नामाचे सामान्यरूप या-कारान्त
होते.
* गाणे- गाण्यात
4) ऊ- कारान्त नपुसकलिंगी नामाचे सामान्यरूप आ-कारान्त
होते.
*शिंगरू-शिंगराला वासरू- वासराला
5) काही उ- कारान्त नपुसकलिंगी नामाचे सामान्यरूप
वा-कारान्त होते.
* कुंकू- कुंकवाचा
------------------------------------------------------------
इतर काही नियम-
1)सामान्यरूप होताना म पूर्वीचे अनुस्वारासाहित
अक्षर हे अनुस्वार विरहीत होते.
* किंमत- किमतीला गंमत- गमतीचा
2) सामान्यरूपाच्या वेळी उपांत्य अक्षर क किंवा प
चे द्वित्व असल्यास ते निघून जाते.
* छप्पर- छपराचा
3) पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी सा असल्यास
सामान्यरूपाच्या वेळी शा होतो.
*पैसा- पैशाला
4)शब्दाचे उपांत्य अक्षर ई किंवा ऊ असेल तर सामान्यरूप ई-
ऐवजी य व ऊ- ऐवजी व येतो.
* फाईल- फायलीत देऊळ- देवळात.
------------------------------------------------------------